"तुलाही एक बहीण आहे"....
(भावा-बहिणीचं पवित्र नातं असतं अन म्हणूनच त्या नात्याचा आधार घेऊन सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण जगातलं सर्वांत सुंदर नात या व्यतिरिक्त दुसरं कोणतं असेल अस मला वाटत नाही कारण इथं द्वेश, ईर्षा, भांडणामागे सुध्दा प्रेम लपलेले असतं अस हे सुंदर नात असत.आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण...असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही. म्हणून कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल, तिच्याच पोटी अशी बहीण निर्माण केली. कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने फुललेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....! म्हणून याच नात्याच्या प्रवासातून पुढचा लिखाण प्रवास....)
प्रिय तरुण भावास,
स.न.वि.वि,
मी इकडं तुझ्या विचाराविषयी थोडीशी चिंतीत आहे, कारण विषय अनेक आहेत पण आज मी तुला मुद्दामहून एकाच विषयावर बोलणार आहे. तू आता तरुण झाला आहेस म्हणजेच वाढत्या वयाबरोबर तरुण बुद्धीलाही अनेक पालव्या फूटत असतात आणि या वयात होणाऱ्या सर्व गोष्टींची विचारांची मला कल्पना आहेत. मला वाटतंय न राहून तुझ्याबरोबर शेअर कराव्यात अन त्या प्रत्येक बहिणीने आपल्या भावासोबत कराव्यात अस मला वाटतं. आपली आज ती वेळ आली आहे. तू आता तरुणपणाच्या वाटेवरून जात आहेस, तुझ्याही आजूबाजूला अनेक गोष्टीं घडतांना तुलाही दिसतात, त्यातल्या काही तुला आज बोलूनच दाखवते. खरंतर अशा गोष्टी समोरासमोर बसूनच व्हायला हव्यात पण त्या काय होताना दिसत नाहीत. कारण लैंगिक शिक्षण म्हटलं की नाव वाचूनच तोंड वाकडी होतात, म्हणून असा सवांदच आपल्यात घडत नाही. पण मी मात्र याबाबत आज धीरगंभीर आहे अन एका संवेदनशील विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतेय.
एक मुलगी म्हणून मी तूला बोलतेय,ना की बहीण म्हणून बोलणार आहे. रोज उठून दिवसाची सुरुवात करतांनाच सकाळच वाईट जाते. तुला माहितेय मी गच्चीवर कपडे वाळत घालायला गेल्यावर त्या शेजारच्या पोरांच्याच वाईट नजरा माझ्यावर पडतात, अशी माझी दिवसाची सुरुवात. नंतर सर्व आटोपून ऑफिसला जातानाही अनेक बरे वाईट प्रसंग येतात. दिवसाची सुरुवातच अशी झाल्याने घरून निघण्यास उशिर होतो. धावत पळत जाऊन बस पकडावी लागते. बस भरगच्च असल्याने बसायला जागाच मिळत नाही, मग नाईलाजाने बसमध्ये उभं राहून जावं लागतं. त्यावेळी डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत अनेक घाणेरड्या नजरा माझ्यावर रोखलेल्या असतात. कधी नकोसे स्पर्श, बसमध्ये चढतांना उतरतांना उगाच धक्काबुक्की करणे, हळूच कुजबुजले जाणारे घाणेरडे शब्द... खूप वाईट वाटतं रे ऐकून...वाटतं की ऐकायला कानच नसावेत. हे सारं कॉलेजला जाणारी तरुणच करतात असे नाही तर काही सांसारिक माणसंही याना साथ देतात. खर सांगू ही मंडळी आमच्यासोबत सर्व काही अशी कृत्य करतांना दिसतात ना त्यावेळी झटकन तुझा चेहरा समोर येतो. त्यांनाही घरात बहिणी असतील, तरीसुद्धा त्यांचं अस वागणं मनाला हादरवून टाकत रे...आणि किळस वाटते अशा विचारांची, "आपली ती बहीण आणि दुसऱ्याची 'ती' उपभोगवस्तू". एक मुलगी म्हणून, बहीण म्हणून तुला हे सांगायच आहे की प्रत्येक मुलींचा आदर कर.. त्यावेळी जसा तुझा चेहरा माझ्यासमोर येतो ना तसं लक्षात ठेव... "तुलाही एक बहीण आहे"....
आज तुलाही सांगते, माझ्या जन्माची सुरुवातच नकोशी म्हणून झाली आहे. जरी तू वंशाचा दिवा पेटवणार असशील तरी मी पणती म्हणून तेवत राहण्याचा प्रयत्न करीन. जन्म नकोशी म्हणून झाला असल्याने सर्वचजण मला नकोसे करून टाकतात. मला माझ्या आवडीने आवडीचं काम करता येत नाही , कारण घरातूनच नकार असतो, का तर जग चांगले नाही. तुला तर माहीतीच आहे की मी आता पोस्टग्रॅज्युएट आहे. माझ्या शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे, मग कामावर जात असताना रात्रीच्या शिफ्ट घेऊ नकोस म्हणून सांगितले जाते. पण तुम्हा मुलांना हे कधी सांगितले जातं का..? तर तुम्ही तरुणांनी अस वागा की, प्रत्येक मुलीला रात्री सुद्धा दिवस वाटला पाहिजे, तिला आपण सुरक्षित आहे अस वाटलं पाहिजे, असं वर्तन ठेवा. आदर कर प्रत्येक मुलींचा, लक्षात ठेव..."तुलाही एक बहीण आहे".
मी दररोज वर्तमानपत्र वाचत असते. चांगल्या बातम्या फारच कमी वेळा वाचायला मिळतात. आणि अनेक हिंसक बातम्या वाचायला मिळतात. कुठे ऐंशी वर्षाच्या स्त्रीवर बलात्कार होतो तर कुठं नवजात चिमुकल्या जीवावरसुद्धा. या बातम्या वाचताना सुद्धा काळजाचा ठोका चुकतो रे...दिल्लीतली ती तरुण निर्भया, कोपर्डीतील ती चिमुकली आणि यांच्याच सारख्या अनेक मुली ज्यांनी जिवंतपणीच मरणयातना सोसल्या त्यांचा डोक्यात विचार जरी आला तरी संपूर्ण शरीर थंड पडत रे...थरथर कापल्यासारखं होत...समाजातली ही नीच प्रवृत्ती इतकी वाढली आहे की, याना कुठल्याही गोष्टीच भान राहिलं नाही. मग ते वय असो किंवा तिच्याशी असलेलं नातं असो. सगळं क्षणार्धात विसरून जातात. आणि जिवंतपणीच तिच्या देहाचे गिधाडाप्रमाणे लचके तोडतात. गिधाडसुद्धा मरणाची वाट पाहतो, पण मानव थांबत नाही. इतकी वाईट प्रवृत्ती निर्माण झालीय. खर तर यांना यावेळी आठवायला हवं..."तुलाही एक बहीण आहे".....
खरंतर या साऱ्या बातम्या वाचत असताना, टिव्हीवर पाहत असतांना, तो एका मुलीवर, स्त्रीवर झालेला बलात्कार नसतो....तर ती बातमी वाचत असणाऱ्या , ऐकत असणाऱ्या प्रत्येक स्त्री जातीला या मरणयात्रा जाणवतात रे...ते कृत्य करणारे नराधमही एक स्त्री पासूनचं जन्माला आलेले असतात आणि तशाच एक स्त्रीवर असा अत्याचार करतात. काहीच वाटत नसेल का रे त्यांना..? अशी एखादी घटना घडली की, पुन्हा आपला समाज पुढे सरसावून धावून जातो, हातात मेणबत्त्या घेऊन तिच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करतात, न्यायालयात न्यायाचे राजकारण सुरू होते, एकमेकांच्या जातीपाती समोर येतात, का कशामुळे होत एवढं..? समाजतून आशा गोष्टी थांबायला हव्यात मुलींवर बंधन घालायला हवीत यासाठी चर्चा होते पण मला वाटते की, बंधन मुलींवर स्त्रीजातीवर न घालता त्या समाजातल्या नराधमांच्या घाणेरड्या वृत्तीवर बंधनं घालायला हवीत आणि याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून करायला हवी. आणि यांना लक्षात यायला हवं की, "तुलाही एक बहीण आहे"....
खरंतर मुलांशी या गोष्टींबद्दल पालकांनी संवाद साधायला पाहिजे. हल्लीचा हरवलेला संवाद पुन्हा वाढायला हवा. लहानपणीपासुनच स्त्री चा आदर कर हे शिकवायला हवं. संवाद नसल्याने मोबाईलचा वापर वाढला अन त्यामध्ये सध्याची पिढी गुंतून राहिली आहे. पॉर्नसाईट, युट्यूब, अश्लिल साहित्य यांचा ऑनलाईन वापर ही मुलं करू लागलीत. मोबाईलचा गैरवापर होऊ लागला हे हल्लीच्या पालकांना वेळीच लक्षात येत नाही. कॉलेजच्या कट्ट्यावर मुलींची अनेक मापं काढत बसण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षिततेवर चर्चा करायला हवी. आपल्या घरचे संस्कार इथं कट्ट्यावर मांडण्यात यावेत. माझे संस्कार चांगले आहेत याची जगाला प्रचिती करून द्यावी. आणि प्रत्येक मुलीचा आदर करायला शिकलं पाहिजे आणि आठवायला हवं, "तुलाही एक बहीण आहे".....
मला माहिती आहे, आपलं कॉलेजच वय हे अगदीच अल्लड असतं. सगळे म्हणतात की तरुणपणात
होत असतात या चुका. पण मला वाटतं आताच जर आपण स्वतःला सावरलं तर पुढे जाऊन पश्चाताप करून घेण्याची वेळ येणार नाही. अनेक आकर्षणे असतात समोर पण स्वतःसाठी योग्य व अयोग्य काय हे आपल्या तरूणांना काळायला हवं. काल परवाच्याच पेपरमध्ये एक बातमी वाचली, मन अगदी सुन्न झालं, काळजाच्या चिंध्या झाल्या. एका मुलीने नकार दिला म्हणून सूडबुद्धीने त्या मुलाने चक्क तिच्यावर ऍसिड हल्ला केला. क्षणार्धात तिचं अस्तिव होत्याचं नव्हतं केलं. खरंच इतकं कठीण असतं का रे एका मुलीचा नकार पचवणं..? हेच का तुमचं पौरुषत्व. त्यावेळी मुलीचा आदर करायला हवा आणि आठवायला हवं, "तुलाही एक बहीण आहे".....
तुलाही कोणीतरी मुलगी आवडली असेल. पण तुला आवडली म्हणून त्या मुलीला तू ही आवडायलाच हवास, अशी अपेक्षा करण साफ चुकीचे आहे. तिचंही काही मत असू शकते. तू तिच्याही मताचा आदर करायला हवास. खूप हळव्या असतात रे मुली...तुम्ही त्यांना खंबीर बनवण्यास मदत करायला हवी. त्यांना गृहीत न धरता त्यांचाही स्वतंत्र वेगळा विचार असू शकतो हे लक्षात घ्यायला हवं. कुठल्याही स्त्री जातीसाठी तिची इज्जत खूप महत्त्वाची असते, तिच्यासाठी आणि तिच्या कुटूंबासाठीसुद्धा. स्त्री चं जीवन हे काचेच्या भांड्याप्रमाणे असतं, जरासा धक्का लागला तरी ते टचकन फुटतं. याचा विचार करायला हवा. तुझ्या स्वतःच्या अहंकारासाठी, मजेसाठी कुठल्याही मुलीला स्त्री ला फसवू नकोस. आदर कर प्रत्येक मुलीचा आणि लक्षात ठेव, "तुलाही एक बहीण आहे".......
तू जे समाजात वागतोय, कोणतेही कृत्ये करतो तो म्हणजे आपल्या घरातील संस्काराचा आरसा असतोस. आपले आईवडील आपल्याला नेहमीच चांगले संस्कार देतील. आपल्याला उत्तम नागरिक बनवतील. या समाजाकडूनही आपणांस खूप काही शिकता येण्यासारखे असतं. तरीसुद्धा मी तुला काही गोष्टींची आठवण करून देत आहे. पत्र पूर्ण करताना तुला इतकेच सांगावेसे वाटतं की, अन्याय करणारा गुन्हेगार असतो ना तसाच अन्याय होतांना केवळ बघत राहणारा हा सुद्धा तितकाच दोषी असतो. तुझ्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल तू ही आवाज उठवावा. तुझ्या समोर कोणत्याही मुलीची स्त्रीची अवहेलना होत असेल तर ती तू थांबव. मग कधीकधी आमच्या मनात विचार येतो, ही पुरुष जात नसलेलीचं बरी. पण माझ्यासारख्या वेड्या बहिणीला तू जर आज वचन दिलास तुझ्या अपेक्षा, भावना मी पूर्ण करतोय तर या वेड्या बहिणीला याशिवाय कोणतीही तुझ्याकडून अपेक्षा नाही. जेंव्हा सगळे भाऊ असे वागतील तेंव्हा आमच्यासाठी आमचं देवाकडे याव्यतिरिक्त कोणतही मागणं नाही. शेवटी जाताजाता तुझ्या सुखी आयुष्याची देवाकडे भीक मागते. पण पूर्ण करशील ना रे तुझ्या या वेड्या आशेच्या बहिणीच्या अपेक्षा, भावना........
तुझीच,
ताई / माई.
स्वतः मी प्रविण आणि माझी मैत्रीण प्रगती हिच्या मुक्तसंवादातून निर्माण झालेल्या तिच्या प्रतीच्या एक 'मुलगी' म्हणून तरुणाईकडूनच्या तिच्या अपेक्षा आणि भावना....
हे सर्व मी तरुण पुरुष 'ती' म्हणून तिच्या भावना लिहल्या.. एका वेगळ्या शब्दरुपात म्हणजेच एक पत्रातून मांडण्याचा प्रयत्न केला......हल्ली स्मार्टफोनमुळे पत्र लिहणं विसरूनच गेलंय, मी ही लहानपणी शाळेत असताना बऱ्याचजणांना पत्र लिहायचो, आता बऱ्याच दिवसांनी प्रयत्न करतोय, स्मार्टफोनमुळं पत्राचा खटाटोप बंदच झालाय, तरी पण जुनं ते सोनं म्हणून लिहलं.....
लेखन- श्री प्रविण बाजीराव साळुंखे.
स्थळ- नारायण पेठ, पुणे.
धन्यवाद...
धन्यवाद...
Khup Chan, Pravin!! Keep it Up!! And one more thing, I am one of those, who have your beuitiful letters!!
ReplyDeletethank you
Deleteखूप छान, प्रवीण.पुन्हा माझं मत तेच ,कि हे सारं लहानपणापासून मुलांवर होणारे संस्कार कसे आहेत यावर अवलंबून आहे आणि तेच खूप महत्वाचे असतात.भारत माझा देश आहे ही केवळ प्रतिज्ञा पाठांतरापुराती न राहता ती प्रत्येकाची वृत्ती बनली पाहिजे.
ReplyDeleteथँक्यू मॅडम...खरंय तुमचं म्हणणं....
Deleteखूपच सुंदर लेख लिहिलाआहेस. या समाजातील लोकांना स्त्री म्हणजे काय हे समजाव आणि तिचा आदर करावा हिच एक ईच्छा.अप्रतिम लेख आहे. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
ReplyDeleteखूपच सुंदर लेख लिहिलाआहेस. या समाजातील लोकांना स्त्री म्हणजे काय हे समजाव आणि तिचा आदर करावा हिच एक ईच्छा.अप्रतिम लेख आहे. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
ReplyDeleteNice article pravin, but I have one request, please dont write such article under vyarthashastra, give some another name for this category. Keep vyarthashastra reserved for comedy critics and political critics. Wish you best luck
ReplyDeletethank you... your suggestion definitely right and good... I will try to aply it..
DeleteAgadi tantotant parishtiti mandli aahe...hech maat pratek mulich aahe..Changlyachi suruvat aaplyach gharapasun hona garjecha..
ReplyDelete