"बायको"-नावाचं अदभूत रसायन

              आपल्या या सुंदर पृथ्वी तलावर स्त्री शिवाय सारं काही अपूर्ण आहे कारण तिच्या असण्यानेच आज आपण आणि आपलं अस्तित्व आहे कारण तिनेच जन्म दिला आहे. स्त्री ही आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या नात्यानं येत असते या नात्याची सुंदर सुरुवात होते ती आईच्या भूमिकेतून. आई, बहीण, वहिनी, बायको, लेक अशी एक ना अनेक नात्यानं स्त्री जोडली जाते. आपल्या आयुष्यातील अशाच "बायको" या एका सुंदर नात्याचा प्रवास आणि तिची भूमिका आज लिहावंसं वाटली. आज कित्येक उदाहरणे देता येतील की स्त्री शक्तीच्या ताकदीवर आज यशाच्या शिखरावर आहेत. त्या ताकदीमध्ये बायको या नावाचा खूप मोलाचा वाटा असतो. हल्ली बायकोवर फार कमी बोललं जातं कारण बोललं तर 'बायल्या' नाही बोललं तर 'याला अक्कलच नाही' असे गुण आपल्याला आपल्या समाजाकडून मिळत असतात.

(छायाचित्र- प्रातिनिधिक स्वरूपात इंटरनेटवरून)
                        
                       "बायको"- 'ती'ला समजून घेताना...

              बायको म्हणजे आहे तरी कोण ? कुठली ती अनोळखी उनाड मुलगी आयुष्यात येते आणि आपलं आयुष्यचं बदलून टाकते. आपल्या जीवनाची अर्धांगिनी बनते. बायको हा शब्द किती सुखद वाटतो ना.  माझ्या मते बायको ह्या शब्दाला जर फोडले तर "बा" म्हणजे नेहमीच सत्याच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी, "य" म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आणि "को" म्हणजे आपल्या कुटुंबासाठी कोणताही त्याग सहन करणारी आणि फक्त कुटूंबसाठी जगणारी. अनेक सुख दुःखात साथ देणारी म्हणून तिला बायको असं म्हंटलं जात. आपल्या जीवनात मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं पण बायकोला जर मैत्रिण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल शेवटी नवऱ्यापेक्षा अधिक जवळचा मित्र तिच्यासाठी कोणीही नसतो.
             आमच्या खेड्यामध्ये लोक तर आपल्या बायकोची ओळख करून देताना अभिमानाने सांगितले जाते, "ही माझी मालकीन हाय".  ऐकायलाही किती भारी वाटतं ना.त्यावेळी आमच्या या मालकाची मालकींन पण अभिमानाने पाहते. किती सुखद असत हे नातं, या नात्यात कोणताही स्वार्थ दिसत नाही. ती अनोळखी घरात येते अन त्या घराचं रूपंच पालटून टाकते. तिचं अख्ख आयुष्य आपल्याला भेट म्हणून देते. ती किती सहजपणे नवीन कुटुंबात रममाण होऊन जाते. घरातल्या प्रत्येकाची  नात्याने वेगवेगळ्या भूमिका बजावते. ती आली की कुणाची मामी होते, लगेच कुणाची वहिनी होते, सून होते. तिच्या पूर्वीच्या घरी ती एका राजाची राजकन्या असली तरी नवीन कुटुंबात बायकोच्या भुमिकेत येते. प्रत्येकाशी नातं जपण्याचा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. बघता बघता ते अनोळखी घर तीच कस होऊन जातं हे पण तिलाचं कळत नाही. नवऱ्याच्या प्रत्येक सुखात ती भागीदार होते आणि दुःखात पण सहभागी होते.
                जीवनाची रेषा चालत असताना आपल्या कौटुंबिक समाजात बायकोच्या कुबड्या घेण्याची आमच्यातल्या नवरोबाला फारच आवश्यकता भासते. सकाळी अंघोळीला गरम पाणी, गरमागरम चहा, दूध, नाश्ता, जेवणाचा डबा एवढंच काय आमच्या कपड्यांची बटणं पण लावण्यात तिचा हातभार लागतो. सकाळी जर तिच्या विना दिवसाची सुरुवात केली तर आमचा दिवस फारच बेशिस्त जातो, अशी आमची पुन्हा तक्रार राहतेच. मुलंबाळ, सासूसासरे घरातील अन्य मंडळी यांचं ती सर्व कामे निमुटपणे पार पाडत असते. तिला या सर्व कामाचा कंटाळा सुध्दा येत नाही. प्रत्येकाची काम ती हसत हसत पार पाडते. घरात झोपताना सुद्धा ती सगळ्यात शेवटी झोपते आणि सकाळी कुणी उठायच्या आधी लवकर उठून तिची निम्मी काम पार पाडलेली असतात. एवढं सार करून ती पुन्हा तिच्या ऑफिसला कामावर जाण्यासाठी तयार पण होते. एवढी मोठी ताकद कुठून येत असेल बर..? हा मनाला कधी कधी प्रश्न पडतो.
              ज्यावेळी ती घरामध्ये नसते तेव्हा घरातील सगळी मंडळी अख्ख घर डोक्यावर घेतात. ती नसतांना तिची खरी किंमत कळते. तीही कधी कधी निस्वार्थी भावनेने पदर खोचून बोलून दाखवते, 'मी आहे म्हणून तुमचं घर आहे, नायतर काय ? मी आहे म्हणून टिकले तुमच्या संसारात दुसरी कोण टवाळी असते ना कधीच वाजवले असते तुमचे बारा अन गेली असती पळून.? ' आपल्या सर्व सुख-दुःख मध्ये ती सहभागी असते. आपल्या समोरच्या परिस्थितीला तीच पांघरूण घालत असते. एकवेळ ती जेवणार नाही पण घरातील अन्य कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी ती घेते. तिच्या आयुष्यात त्यागाशिवाय दुसरं काही लिहिलेलंच नसतं. एवढंच काय ती जेव्हापासून तुमच्या आयुष्यात आली तेव्हापासून तिच्या खऱ्या नावाची ओळख सुद्धा पुसली जाते. नवीन घरात तिला नवा जन्म घ्यावा लागतो. तिच्या आवडी निवडी सगळ्या संपुष्टात येतात. तीच सारं सौख्य तिच्या नवऱ्यासोबतच असतं. तिला स्वअस्तित्वसाठी काहीच घ्यावस वाटत नाही. कुठुन शिकते एवढा निस्वार्थीपणा कुणास माहीत..?
              नवीन घरात आल्यानंतर दिराला भावाचा, सासूला आईचा, सासऱ्याला वडिलांच्या, नंदेला मैत्रिणीचा अशी दर्जेदार प्रेमळ नाती देऊन मीठ कसं पाण्यात विरघळावं तस ती सासरी संसारात विरघळून जाते. प्रत्येक पुरुषांच्या आयुष्यात बायको नावाचं एक मखमली तोरण आहे म्हणून त्यांचं आयुष्य सुख समृद्धीने वाहत जातं. त्याच्या घरादाराला किंमत येते. चार पाहुण्यांच्या घराकडे वाट वळतात. आपण थकून भागून आल्यावर आपले दिवसभराचे कष्ट लक्षात घेऊन आपल्याला हातात अलगदपने कंटाळलेल्या चेहऱ्याकड पाहून हसून एक चहाचा कप ठेवते,  मग निघून जातो सारा कंटाळा, अस अनेक जणांचं असतं. घरामध्ये कुणी आजारी पडला तर त्याची सेवा करण्यात कुठंही कमी पडत नाही.
               कुटुंबातील घटक म्हणून तिची सारी ध्येय धोरण ही तिच्या संसारासाठी असतात. संसार गोड होण्यासाठी ती कधीकधी तिखट ही वागते, त्यावेळी घरातील बाकी मंडळीनी समजून घेतलं पाहिजे. तिलाही राग-लोभ, रुसवे-फुगवे, ऊनी-दुनी, मानपान सगळं असतं पण ते सर्व एकत्र करून प्रत्येककाला समजून घेऊन सर्वाशी जवळीक साधून जुळवून घेते. या जुळवाजुळव करण्यात आपण किती पुढे गेलोय हे तिलाच  कधीकधी उमगत नाही. सण- समारंभात तिच्याशिवाय पूर्णच होत नाही, तिच्यामूळ घर सजत, बाकी नवनवीन पदार्थ खायला मिळतात. सणात भांडून का होईना पण त्यातही पैशाची काटकसर व्हावी म्हणून  सणाला हलकीच साडी घेणार. कधीकधी नवरा-बायकोची भांडण होतात, पण जेंव्हा नावऱ्याच्या प्रेमाच्या कुशीत येते तेंव्हा आपल भांडणच झालं नाही असं राहून विसरून जाऊन ती घरास एकरूप होऊन जात असते आणि सगळं घर तिचच होऊन जात, साऱ्या घराला ती कुशीत घेते. तिला विरोध करण्यासाठी सुद्धा कुणाची हिम्मत होत नाही कारण आयुष्यभर उपयोगी पडावं अस तीच धोरण असत. कुठून येत असावा इतका समजूतदारपणा, काय माहीत..?
            बायको नावाच्या या नात्याला वेगळाच गंध आहे, या नात्याला श्वासाशिवाय दुसरं कुठलंच नाव द्यावास वाटत नाही, कारण श्वास हा नेहमीच आपल्याला जिवंत ठेवत असतो त्याप्रमाणे बायको ही नेहमीच आपला संसार जिवंत ठेवत असते. घरोघरी मातीच्या चुली असतात असं म्हणतात ना त्याप्रमाणे आपला नवरा गरीब असो व श्रीमंत त्याला साथ देण्यासाठी लग्न झाल्यावर आपल्या नवऱ्यासोबतच ती क्षणांची साथ नव्हे तर सात जन्माची साथ देण्यासाठी तत्पर राहते. मला श्रीराम लागू यांच्या एक नाटकातील(नाव आठवत नाही) नवरा-बायकोच्या प्रेमातील एक सिन आहे, तिथं हे दोघे आयुष्याच्या एक टप्प्यावर येऊन थांबलेले असतात तिथं हे जुन्या आठवणींना उजाळा देत असतात, त्या उजाळा देताना भविष्यचा पण विचार करताना दिसतात, तिथं लागू म्हणतात मला मरण तूझ्याआधी यावं करण तू पुढं गेल्यावर मी कसा इथं राहणार, तुझ्याशिवाय राहूच शकत नाही, त्यावेळी त्यांची बायको उत्तरते, सारं सुख तुमच्याच का वाट्याला यावं ? काहीही अपशकुन बोलू नका, मला ही जाताजाता सुखाचा आनंद घ्यायचा आहे, म्हणून मी तुमच्या आधी जाणार. हा सिन पाहताना आपले डोळे पाणावले जातील इतका खोल अभिनय यांनी केलाय. इथपर्यंतच सुख बायको आपल्या नवऱ्याला वाटून टाकते. कारण तिने तीच सर्वस्वाचा त्याग करून तुम्हाला ते दान केलेलं असत. नवरा' आयुष्यभर 'नवराच' राहतो, पण 'नवरी मुलगी' मात्र 'बायको' बनते. आणि ही बायको प्रत्येक कुटूंबात सुखाचं सोनं आणि यशाचं नंदनवन फुलवते. अशी असते ही "बायको".


लेखन- श्री.प्रविण बाजीराव साळुंखे.(पुणे)

हा लेख आमचे परममित्र भाचे प्रा.लखन जाधव यांना समर्पित. लवकरच त्यांच्या आयुष्यात हे बायको नावाचं अदभूत रसायन येणार आहे. (याला मामी यायच्या आत भाचा जावई झाला.एक खंत-गमतीने)

Comments

  1. मस्त ... अप्रतिम

    ReplyDelete
  2. 👌👌👌👌सुरेख

    ReplyDelete
  3. 👌👌👌👌सुरेख

    ReplyDelete
  4. तुला वेध लागले... लग्नाचे!!! 😀

    ReplyDelete
  5. हाहाहा!!!... प्रविण जी ... तुम्ही पण मनावर घ्या... भाच्या च्या अधिक उ तुमचं... ;)

    ReplyDelete
  6. Tuz maz jamena tuzya vachun karmena as Naat..! Khatti mithi takrar..fir bhi jinme pyar...Tyalach tr mhantat Jodidar...👫💑😊

    ReplyDelete

Post a Comment

Thank you...

Popular posts from this blog

अनंत..पत्रास कारण की...

बाबांन लेकी साठी लिहलेली कविता...

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी....!!!!