स्त्री जन्मा ही तुझी कहाणी....!!!!




           "यत्र नार्यस्तु पुज्यते! रमन्ते तत्र देवता !" अशी नारी पुजनाची महती संस्कृत सुभाषितकाराने गायिली आहे. या जगात फक्त दोनच जाती आहेत ती म्हणजे एक पुरुष, दुसरी स्त्री. नारीचे(स्त्री)  पूजनीय स्थान सांगत असताना 'न स्त्री स्वातंत्रमहर्ती...!! असे म्हणून तिच्या स्वातंत्र्याची किल्ली मात्र पुरुषांच्या हातांत देऊन टाकली आहे.
                       "तुच माता तुच सरस्वती,
                        तुच कालिका, तुच रणरागिणी,
                        तुच या विश्वाची वसुंधरा,
                        तुच सखी नि तुच दामिनी,
                        तु इंदिरा, तू झाशी,
                        तु जिजाऊ तु सावित्रीबाई,
                       तु प्रतिमा, तु कल्पना,
                       तु आदिशक्ती, तु संयमाचा महामेरू"
              अशा एक ना अनेक प्रकारे स्त्रीची विविध रूप समोर येतात, आपण त्यास पाहतो; पण आज हे प्रत्येक स्त्रीला उपभोगता आलं का ? ती स्वतः तिचं रक्षण करण्याचे कार्य करू शकते का ? स्त्री वंदनीय आहे, पुज्यनिय आहे म्हणून ती रक्षणीय आहे. पण रक्षण करण्याचं काम ती स्वतः करू शकत नाही. जंगलाच्या राज्यात सिंहणीच्या मदतीला सिंहाला येण्याची गरज भासत नाही, परंतु मानवी जातीत ही गरज भासते. मानवी संस्कृतीची जडणघडण ही स्त्री व पुरुष या दोघांवरती आहे. पण सहकार्याच्या पातळींवर त्यांच्यातील समानतेपेक्षा पुज्यनियत्व किंवा दुय्यम समजून राक्षणीयत्व ही भूमिका स्त्रीच्या वाट्याला आली. तिच्यावर होणाऱ्या अत्याचार, अन्यायास हे दुय्यमत्वशी संबंधित आहे.
             स्त्रीचा घरात जन्म झाला त्या दिवशीपासून तिच्या दुजाभावास सुरुवात होते. अगदी घरामध्येती लहानपणापासून तिच्या खेळायला असणाऱ्या खेळण्यावरून म्हणजेच तिला बहुरंगी बाहुल्या, प्रतिकृती संसाराचा लहान भांड्याचा सेट आणि मुलांना काय तर कार,विविध गाड्या चैनीच्या वस्तू ई साहित्य घेऊन दिले जाते. आपण सर्व काही माहीत असताना सुद्धा हा दुजाभाव केल्याशिवाय रहात नाही. तिथुनच तिच्या दुजाभाव वृत्तीची सुरुवात होते अगदी ती लग्न व लग्नानंतरच्या वास्तव्यात आल्यावर तिची सुरवात होते तिच्या नावाच्या बदलावरून, तिची घरात आल्या आल्या पहिल्याच पाऊली तिची जुनी ओळख पुसली जाते. तिच्या आवडी निवडी , कला, या सगळ्या धूळ खात पडतात. तिचं जून अस्तित्वच शिल्लक राहत नाही. तिच सर्व आयुष्य तिच्या नवऱ्याच्या हाती जातं, पुन्हा ती नवऱ्याच्या हातातील बाहुली होते. का तर पुरुषप्रधान संस्कृती आहे ना आमच्याकडे, आमचं असंच असतं..!! असंच स्त्रियांना वागणूक देतो आम्ही..!! अहो तुम्ही आम्ही स्त्रीला स्त्री ठेवली नाही तर दासी केली. सतत तिच्यावर अन्याय अत्याचार केले.
                स्त्री नववधू मापट ओलांडून घरात आल्यावर लक्ष्मी आली असे आपण मानतो, तिची पूजाही करतो. त्याचं वेळी अपघाताने तिचा नवरा अथवा घरातील कुणी अन्य व्यक्ती मरण पावले तर त्याच लक्ष्मीला आपण नावं ठेवतो, तिचा छळ सुरू करतो, आली पांढऱ्या पायाची म्हणून आपण तिला हिनवतो, वास्तविक हिचा याप्रकरणी काहीच संबंध नसतो पण हे दुःख मात्र तिच्या वाट्याला आपोआपच देतो. एक साधी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, क्रिकेटच्या मैदानात विराट झिरोवर आउट झाला तर सगळा दोष अनुष्काच्या माथी, पण जिंकल्यावर श्रेय मात्र नाही. अरे तू खेळ ना तिकडं हिच्याकडे कशाला लक्ष तुझं. चांगले घडल्यावर श्रेय मात्र द्यायचं नाही पण वाईट झालं तर नको असेल तरी रेटून सारायचं. एवढंच काय तर कुटुंबातील दारिद्र्याचे चटके सुद्धा स्त्रीलाच मोठ्या प्रमाणात सहन करावे लागतात. घरात एक कप दूध असले तर ते मुलांस दिले जाते पण मुलीला दिलं जात नाही, मुलगा वंशाचा दिवा ना..!! ह्या दिव्याला  अन्यायाचा दिवा लावण्यासाठी इथंच प्रोत्साहन दिलं जात. पण त्या पणतीवर मात्र तिच्या स्वयंप्रकाशी उजेडाला तिथं झाकण टाकलं जातं.
                आपणा सर्वांचा कट्ट्यावरचा आवडता विषय म्हणजे स्त्री चारित्र्य. माझा अनुभव, कुठल्याही कॉलेजमध्ये ,कुठल्याही मुलींना वाटेल तसं अचकट विचकट शब्दाचा वापर करत बोलणे, तिच्या चारित्र्यवान शरीरावर अब्रूचे धिंडवडे उडवणे. आपल्या वासनाधिन नजरेने तिच्यावर बलात्कारच करणे. रस्त्यावरून जात असताना, एसटी बस प्रवासात असताना तिला कुठं धक्का मारता येतो का, चिमटा काढता येईल का..? हेच सतत डोक्यात विचार..!! "हसली म्हणजे फसली" म्हणजेच आपल्यासाठी ती उपलब्ध आहे, असाच पुरुषी विचार डोक्यात येतो. तुला माहितेय का ही काल दुसऱ्या एकाबरोबर बाहेर फिरायला गेली होती..!! दुसऱ्याबरोबर जाते, आणि तुझ्या बरोबर नाही म्हणून हे सर्व काही काय..?
                      तुम अगर मुझको चाहो तो कोई बात नही,
                  मगर तुम किसीं ओर को चाहो तो मुश्कील होगी.!!
                 खूप साध्या साध्या गोष्टींमधून आपण स्त्री ला दुजाभावाची वागणुक देत आलो आहे, ती रस्त्यावरून गाडीवरून जात असताना आपणास ओव्हरटेक करून गेलेली सुद्धा पुरुषी मानसिकतेत सहन होत नाही. पुरुषांच्या बरोबर स्पर्धा करून एखादं यश मिळवले तर वाटेल तसं तिच्याबद्दल, चारित्र्यबद्द्ल बोललं जातं. बऱ्याच गोष्टी मनाला टोचणाऱ्या आहेत की , हल्ली स्त्री पुरुष समानता आणायला हवी, सबलीकरण व्हायला हवे, नुसतंच आपण म्हणतो, कृती करतो ती फक्त कागदोपत्रीचं. स्पर्धा परीक्षाच्या वेळी एखादी महिला उमेदवार मुलाखतीस पात्र झाली तर तिला हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, तु कुटुंब आणि नोकरी/करिअर यांचा कसा मेळ साधणार म्हणजे ते कसं सांभाळणार ?? पुरुषांच्या मुलाखतीला हा प्रश्न विचारला जात नाही. तर कुठं करतोय आपण सबलीकरण, हेच का आपले विचार...स्त्रियांच्या बाबतीत म्हणजे काय तर  " जे शरीर घेऊन आले तेच तुझं अस्तित्व ठरवणार...!!! तर इथं मी ठामपणे म्हणेन की, "Women is not born, Society makes her."
"All women live by rape scheduled."
                  ती जीव लावते, जीव टाकते, जीव गुंतवते, तुम्ही जीव घेता, ती सुद्धा जीव घेते पण तिनेच घ्यावा असे वाटावं आशा पद्धतीने घेते. तुमचंच करता करता ती स्वतःला विसरून जाते, तुम्ही तिला विसरता , ती सर्व काही सांभाळून घेते, तुम्ही तीच मन सुद्धा सांभाळत नाही. तुमच्या यशात ती आनंदी होते, तुम्ही आनंदाच्या भरात तुम्ही तिचा उल्लेख सुद्धा विसरता. तिचं अस्तित्वच सुंदर आहे, पण तुम्हाला तिच्या शरीरापालिकडे काही दिसत नाही. ती जीवन सुंदर करते पण तिच्याच वाट्याला विटंबना येते.  तुमचंच करता करता स्वतःला काही उरत नाही, तिला गृहीत धरता धरता तुम्हीही तिचे उरत नाही, आणि मग  तुम्ही तीच रक्षण काय करणार..?? तिच तुमची तटबंदी आहे, तिला बंदी बनवून आत्मघात करून घेता. घरात ती लक्ष्मी बनून येते, तुम्ही तिचा पोतेरा करता. ती धनधाण्याचं मापट घरात ओसंडते, तुम्ही तिच्या आई-बापासकट लुटून त्याच मातेरे करता. ती माणूस आहे, ती आई आहे, बहीण आहे, वहिनी, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, मुलगी आहे, तुमच्या लेखी ती फक्त मादी आहे. ती लक्ष्मी, दुर्गा, गौरी आहे, नित्पात केलेल्या कवट्याची माळ गळ्यात घालून रक्तानं माखलेलं राक्षसाच मुंडकं हातात धरून लाल भडक जीभ बाहेर काढत ती अष्टभुजा आहे, चण्डिका आहे, तुम्ही तिच्यासाठी शिवशंकर का नाही होत...????
              आपली कुटुंब व्यवस्था स्त्रीवर अवलंबून आहे, पण कुटुंबप्रमुख मात्र पुरुषच असतो. कुटुंबाला घडवण्याचं कार्य व सुसंस्कृत करण्याचं काम स्त्री करीत असते. आज उभी असलेली संस्कृती तिच्या त्यागावर, सहनशीलतावर , संयमावर व स्वतः पुढे न येता इतरांना पुढे येण्याचे संस्कार देण्यावर आधारलेली आहे. एक प्रकारे ती सर्वांचा आधारस्तंभ झाली, त्यास इतिहास साक्षीदार आहे. एवढे असूनही आजची स्त्री स्वातंत्र्य चौकटीतच आहे. तिच्या सहनशीलता, संयम, शांत, स्थिरकृती यांचा आपण गैरफायदा घेतला आहे.  आजची आपली स्त्री म्हणजे आपल्या दृष्टीने शेल्फमधला ग्लास उचलला आणि भरलं पाणी अन लावला तोंडाला, अशीच आपली मानसिकता..!!! आपल्या डोक्यातल स्त्री सौन्दर्य म्हणजे स्त्रीचा ३४-२४-३६ आकार, पण तिच्या मनातल्या सौंदर्यला, भावनेला आपण कधीच विचारले नाही. इतके खालच्या पातळीवरचे आपले विचार.  "स्त्री जन्मा ही तुझी कहाणी! हृदयी अमृत नयनी पाणी!" असे तिचं वर्णन केले जाते. ती हळवी असल्याने तिच्या डोळ्यांत टचकन पाणी येते. दुसऱ्याच्या दुःखाने ती विव्हळ होते, हे एक प्रकारचे मानवतेचे मोठे लक्षण आहे. ती स्वतःवरचा अन्याय दूर करू शकत नाही म्हणून अश्रू गाळत असते, अनेक प्रसंगात असे अश्रू गाळण्याचे तिच्याच नशिबी येते.
                   आजची स्त्री राज्यघटना, कायदे, न्यायालयीन निवाडे, चळवळी, यापुरतीच मर्यादित राहिली आहे असं दिसून येतं. स्त्रीची जाणीव फक्त याच दृष्टीकोन वेळी होते. स्त्रीला तिच्या उदरामध्ये वाढणाऱ्या भ्रूणावर सुद्धा हक्क नाही, अपघाताने, बलात्काराने तीची गर्भधारणा झाली तर तिला तो गर्भ  वाढवायचा की खाली करायचा  अधिकार  असला पाहिजे. पण बहुतेक वेळा स्त्रीच स्त्रीवर अन्याय करताना दिसते. परंतु गर्भ धारण करण्याची क्षमता ही ईश्वराने दिलेली देणगी आहे, तो तिचा अधिकार नाही. अशी आपण तिला वागणूक देतो. बलात्कारपीडित १२ वर्षे वय असणाऱ्या मुलीने बाळाला जन्म दिला, ती बालक असतानाच तिला अत्याचाराला सामोरं जावं लागलं आणि पुढं येऊन तिला आपल्या न्यायालयाने तिचा न्याय खुंटीला टांगला, इथं एवढंच म्हणता येईल की गर्भापासून वृद्धांपर्यंत वाटेवरती तुझ्या काचा...कधी नकोशी म्हणून मारली तर कधी हवीच म्हणून नासवली. एक स्त्री म्हणून तिच्याकडे पाहणेच आपण विसरतो.
                  आपले विचार जर बदलले तर कशाला होतील निर्भया, कोपर्डी सारख्या घटना. आशा घटना घडल्या की , जातीपातीच वेगळंच घाणेरडं राजकारण सुरु होतंय. न्यायालयात हे प्रकरण गेलं की वेगवेगळ्या प्रश्नांची खैरात करून, अजून आपली यंत्रणा लवकर न्याय देण्याऐवजी तिच्यावर अन्यायच करते. एवढे सार फक्त स्त्री म्हणून की काय..??  असे असंख्य प्रश्न मनाला रोज भिडून जातात.
                  आज जागतिक पातळीवर महिला एकत्र येत चालल्या आहेत.शारीरिक पातळीवर स्त्री दुबळी असली तरी बुध्दीमतेच्या, ज्ञानाच्या पातळीवर स्त्री व पुरुष फरक नसतो, हे विसाव्या शतकात अनेक स्त्रियानी सिद्ध करून दाखवले आहे. सन १९७५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले. स्त्रीविषयक प्रश्नांना अग्रक्रमाचे स्थान मिळू लागले. जगभरातील स्त्रीची एक व्यक्ती म्हणून समजून घेण्याकडे लक्ष वेधून देण्याची गरज समाजातील विचारवंतांना झाली. स्त्रीशिक्षण, तिची सक्षमता, तिच्यावर होणारे अन्याय याचे स्वरूप  समजून घेतले जाऊ लागले. आणि त्यानुसार त्याचा प्रतिकार कसा करावा याचे भान समाजाला व समाजातील एक महत्वाचा घटक असलेल्या स्त्रीला येऊ लागला. पाश्चात्य देशातील वरवर सुधारणाची कवचकुंडले धारण केलेले देश असोत व भारत पाकिस्तानसारख्या देश असोत, स्त्रीच्या अन्यायामध्ये फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. अफगाणिस्तानसारख्या मुस्लिमबहुल देशामध्ये तर आजही स्त्रियाविषयी बिकट परिस्थिती आहे. अनादीकाळापासून सर्वसामान्य पातळीवरची स्त्री अन्यायाला, अत्याचाराला व बलात्काराला आपापल्या परीने तोंड देत आली आहे. किंवा पर्यायाने सहन करत आली आहे.
                   सध्या २१ व्या शतकात जगत असताना आधुनिक तंत्रज्ञानात जीवनमान असताना अजूनही स्त्रियांना समानतेच्या पातळीवर वागवले जात नाही. स्त्रीच्या हाती सत्ता देणं अजूनही पुरुषांच्या मानसिकतेत बसत नाही. यावर्षी अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षच्या निवडणूकित नव्यानं राष्ट्रवादी उजवा गट उदयास आला यामध्ये महिला उमेदवार विजयी होण्यास हिलरी क्लिंटन अपयशी ठरल्या. विरोधक ट्रम्प हे उजव्या विचारसरणीचे, स्त्रीवादास पायी तुडवून जाणारे. ही परिस्थिती भविष्यात धोक्याचा इशारा देत आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. हो झाल्या असतील मार्गारेट थेचर, इंदिरा गांधी, अँजेला मर्केल, सिरिना बंदरनायके ई. पण बोटांवर मोजण्या इतपतच. आज जगात जवळपास ५० टक्के महिला आहेत , त्यांना ही इतकी अल्प संधी मिळत आहे, याचा विचार आपणास करावा लागेल. कशा होणार पी टी उषा, कल्पना चावला, अरुंधती भट्टाचार्य ई. आज स्त्रिया शिक्षण, सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात प्रगती साधताना दिसतात परंतु अपेक्षित प्रमाणात नाही. म्हणूनच काय तर स्त्री ला संधी मिळाली तर ती सुधारते नाहीतर ती पुरती पूर्णपणे विस्कटते.
                  पुरुषप्रधान व पितृसत्ताक जीवनामध्ये अशा द्वेषाच्या व स्त्रीला विकसित होऊ न देण्याचा भावना समाज विघातक आहेत. सुसंस्कृतता विकसित करणे, समाजात स्त्री कडे बरोबरीने पाहण्याची सवय लावणे, हे स्त्री -पुरुष दोघांचे कर्तव्य आहे. बलात्कार, अन्याय, अत्याचार करणारा पुरुष हा स्त्रीचा पिता, पती, पुत्र, नातू, बंधू, मित्र, आशा विविध नात्यांनी तिच्याशी जोडला आहे. म्हणून पुरुषांच्या मनामध्ये नात्यांची जाणीव जागृत करणे, जनमत बनवणे, हाच आजवरचा सर्वात मोठा उपाय आहे. यासाठी स्त्रियांनी एकत्र समूहाने यायला पाहिजे. आपल्यातले दोष दुबळेपणा टाकून आत्मविश्वासाने विचारपूर्वक मार्ग ठरवून त्याचा पाठपुरावा केला पाहिजे.
                     व्यक्तिस्वातंत्र्यच्या नावाखाली समाजाच्या भावना चावळतील असा पेहराव करायचा की नाही हे ठरवायला पाहिजे. दूरदर्शन, चित्रपट वाहिन्या, पोस्टर्स यावरची चित्रे आपणांस कमीपणा आणतील व आणणारी आहेत असे तिला जरी वाटत नसले तरी  त्यामुळे आपल्या वरील अत्याचाराला प्रोत्साहन मिळतं हे तिला समजून घ्यायला हवं. कला, व्यवसाय, व्यवहार, करियर, संसार या सगळ्यांचा समाजाच्या दृष्टीने व स्वतःच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करायला हवा. समाजाची दृष्टी व वृत्ती बदलण्याचे सामर्थ्य तिने दाखवले पाहिजे. आजची स्त्री नोकरी- धंदा - व्यवसाय- करीयर यामुळे जीवनात व संसारात स्थिरता आणता येऊ लागली आहे. महिलांनी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई, झांशीची राणी, ताराबाई यासारख्या कर्तबगार ऐतिहासिक स्त्रियांचे आदर्श समोर ठेवले पाहिजे. आणि आपले अध्यात्म, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, शिक्षण, लेखन अशा विविध प्रकारच्या क्षेत्रात आपलं नाणं खणखणीत वाजवले पाहिजे. म्हणूनच पुरुष आणि स्त्रीयांना जाता जाता सांगावस वाटतं-
                       समान मानव माना स्त्रीला,
                       तिची अस्मिता खुडू नका,
                       दासी म्हणून पिटू नका,
                        देवी म्हणून भजू नका..!!!
पर्यायाने स्त्रीच्या  "सबलतेकडे, सामर्थवान होण्याकडे" बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा हाच या माझ्या लेखनाचा दृष्टीकोन आहे.

धन्यवाद.

लेखन- श्री प्रविण बाजीराव साळुंखे.







         

         

Comments

  1. अप्रतिम,प्रवीण.स्त्री कडे पाहण्याच्या तुझ्या दृष्टीकोणाला सलाम!!हे तुझ्या घरातील संस्कार आहेत आणि ते जेव्हा सर्वाना मिळतील ,तेव्हा या विषयावर लेखन करण्याची गरज पडणार नाही.

    ReplyDelete
  2. अप्रतिम,प्रवीण.स्त्री कडे पाहण्याच्या तुझ्या दृष्टीकोणाला सलाम!!हे तुझ्या घरातील संस्कार आहेत आणि ते जेव्हा सर्वाना मिळतील ,तेव्हा या विषयावर लेखन करण्याची गरज पडणार नाही.

    ReplyDelete
  3. Stri samaj ghadavte... Tila ek Manus mhanun jagnyachi n moklepane maat mandnyachi sandhi havich.. Swatahachi olkh nirman karnyachi sandhi pratekila milavi...
    Tumhi mandleli sarva maat agdi yogya aahet. Ajunhi Stri Purush samanta astitvat nahi..Strivr aani tichya matanvr honarya tika aalochana yavrunch he siddha hota..! Garaj aahe ti Stri la Manus mhanjn jagu denyachi..!

    ReplyDelete

Post a Comment

Thank you...

Popular posts from this blog

"तुलाही एक बहीण आहे"....

"बायको"-नावाचं अदभूत रसायन