शिक्षणव्यवस्था ते शिक्षणमहर्षी...
लेखन- प्रविण बाजीराव साळुंखे
कर्मवीर जयंती निमित्त...
आजच्या लेखाची सुरुवात गीतकार कवी विठ्ठल वाघ यांच्या रयतगीताने करावीशी वाटते याला कारणही तसेच आहे की आजची शिक्षण व्यवस्थेतील बदललेल्या वळणाची अवस्थेची गाथा याला यतकिंचितही स्पर्शून जात नाही याची जाणीव होते...
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.
वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||
कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे.
शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे.
धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे.
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||
गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई.
कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई.
स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे.
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||
दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया
अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया.
शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे.
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||
जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी,
इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी
प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे.
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४||
(वरील कविता निनावी संकलित...)
वरील ओळीतून एवढं म्हणता येईल की आज जी शिक्षण व्यवस्था आपल्या शिक्षणसम्राटांनी वेगळ्याच दिशेने सुरू केली आहे तिला कुठंतरी थांबायला हवं, आणि परत जुना विचार जोपासायला हवा. ज्या माउलीने आपल्या सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्र प्रसंगी गहाण ठेवून मुलांना शिकवले त्याच मातीत आपली आताची शिक्षणसम्राट उरलीसुरली जमीन सुद्धा विकायला लावून , शिक्षण घेणाऱ्या कुटुंबास रस्त्यावर आणून आपली शुल्क त्याचबरोबर डोनेशन स्वरूपात शुल्क घेऊन शिक्षण देतात. कधी कधी मनाला वाटतं की आपल्याच याच मातीत जन्माला आले असावेत का ही महान माणसं..!!!! ज्या वेळी शिक्षणाची दारे सर्वत्र बंद होती त्यावेळी यांनी शिक्षणासाठी केलेले प्रयत्न व्यर्थ तर ठरत नाहीत ना अस वाटतं. आता या व्यवस्थेपुढे गुणवत्ता राहिली नाही तर बाजारात भाजीपाला कसा विकला जातो तसा या लोकांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. आधुनिक युगाप्रमाणे आजची शिक्षण व्यवस्था बदलत चालली आहे , नवनवीन तंत्रज्ञाने विकसित होत चालली आहेत , याची चाहूल प्रत्येकाला आहे, आज माझ्याबरोबर असणारा माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती मला त्यानं उच्चशिक्षण घ्यावं अस मलाही वाटतं पण बाहेर डोकावलं असता काही वेगळंच चित्र दिसत आहे.डोनेशन च्या जोरावर पात्र नसतानाही तो पदव्युत्तर अभियांत्रिकी, वैद्यकीय,वास्तुविशारद शिक्षण घेऊन गुणवत्तावाण मुलाच्या समोर येतो. यामुळेच की काय आपल्या सरकारला सुद्धा आता कौशल्य भारत विकास अभियान यासारख्या योजना आणाव्या लागतात, यावरती शिक्षणाव्यतिरिक्त खर्च करावा लागतो शेवटी याच्या कराचा बोजा आपणच सहन करतो , अस जर करायला लागल तर शिक्षण घ्यायचं कशाला....अशा योजना राबवून कुशल करून द्या नोकरी..!!! याचा सरळ अर्थ आहे की आता आपण आपल्या व्यवस्थेत बदल करायला हवा . केंद्र व राज्य सरकारने यावरती जरूर विचार करून योग्य बदल घडवून आणणे आवश्यक आहे.
प्रत्येक जण आपल्या परीने चांगले जीवन जगण्याची धडपड करत असतो, प्रत्येक देशाची यासाठी धडपड सुरू असते, माहिती तंत्रज्ञानाच्या महाकाळ जाळ्याने विणलेल्या या जगात आपल्या शिक्षणाची व प्रगतीची सुरुवात अ- अननसाचे पासून झाली तर आता अ- अणुबॉम्ब पर्यंत येऊन ठेपली. आपल्या शिक्षणाची दिशा कोणत्या मार्गाने करायची याचा प्रत्येकाला त्याच्या सदविवेक बुद्धीने करावी. प्रगती ही असायला हवी , प्रगती वाईट नाही पण मानवी नासाच्या पलिकडे जात असेल तर खरच वाईट आहे , अस मला वाटतं.
आजच्या बदलत चाललेल्या जगाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आपण आपले अस्तित्व पणाला लावून त्यावर मात करीत पुढे जाण्यासाठी धडपड करत असतो. आणि धडपड ही प्रत्येकाची असली पाहिजे. पण त्याला योग्य दिशा असणं गरजेचं आहे.आज ही परिस्थिती बदलली नाही तर उत्तर कोरियातल्या किम जोंग सारखे अनेक जण तयार होऊन विनाशाच्या खाईत आपण कधी जाऊन पडू याची खातरजमा आपणांस ही कळणार नाही आणि शांतता अहिंसेच्या मार्गावर जगण्याचा संदेश देणारे मंडेला, गांधीजीचे विचार बाजूला जाऊन धूळ खात पडतील. शेवटी काय तर बुद्धांनी सांगितलेल्या शांतता, अहिंसा मार्गाचा स्वीकार करणे ही अपरिहार्य आहे. शाहू, फुले आंबेडकर यांचे विचार पुन्हा नव्याने जोपासण्याची गरज आणि धारिष्ट्य दाखवावे लागणार आहे.
आता आपण वर्तमानपत्र तसेच दूरदर्शनवर अनेकदा बातम्या पाहतो, वाचतो त्या म्हणजे विकत पदव्या घेतल्या जातात आणि याजोरावर नोकऱ्या सुद्धा मिळवतात, मला प्रश्न विचारावासा वाटतो की यासाठीच केली होती का शिक्षणाची सुरुवात...!!! अहो...आपल्या देशात आशा अनेक विद्यापीठाना मान्यता नसतांनाही अनेक शिक्षण सम्राटांनी विद्यापीठे साकारली आहेत. गुणवत्तावाण लोकांना यामुळे त्यांची संधी हिरवली जाण्याची शक्यता असते, असे वागणारे याचे या लोकांस अप्रुपही वाटू नये एवढी बुद्धी गहाण ठेवली जाते. खूप काही बदलत चालली आहे आजची व्यवस्था, या बदलासाठी आपणच कारणीभूत आहोत हे मोठ्या मनाने स्वीकार करायला हवा, आणि यावर बदलावर विचार करायला हवा. 'शिक्षणाच्या आईचा घो' म्हणणाऱ्या लोकांच्या जिभेला लगाम लावायला हवा. नाहीतर परिणाम खूप वाईट होण्यास वेळ लागणार नाही.शिक्षणाच्या हक्कासाठी सारे आयुष्य पणाला लावणारे आपले महान शिक्षणदेवता(इथं देवताच संबोधायला हवं) यांच्या कार्याला काडीचीही किंमत राहणार नाही.यांनी केलेले सारे प्रयत्न कष्ट वाया जाणार की काय याचीच भीती माझ्या मनात घर करून राहिली आहे.
आज इतक्या मोठ्या उत्साहाने सारे जग प्रगती करत आहे त्याच जगात अजूनही असे काही देश आहेत त्यांना अजून शिक्षणाचा मागूसही लागला नाही. दक्षिण आफ्रिकेत काही प्रमाणात तर पूर्व आशियाई मुस्लिम बहुल देशात शिक्षणाची क्रांती होणे गरजेचे आहे. तेथील लोकांच्या मनावर अजूनही पूर्वाश्रमीच्या विचारांचा पगडा अजूनही कायम आहे. तसेच काही ठिकाणी स्त्रीयांना अजूनही शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे, यामध्ये परिवर्तन घडवून आणून नवीन व्यवस्था निर्माण करायला हवी. तेथेही कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, सावित्रीबाई जन्माला यायला हव्यात, एवढेच म्हणता येईल.
तस पाहायला गेलं तर शिक्षण देणे-घेणे ही सुरुवात आपल्याकडे कर्मवीरांनी तसेच यांच्यासारख्या बाकी महान व्यक्तींनी सुरू केली अस नाही तर ती फार पूर्वीपासून अनादी ऋषीमुनींच्या काळापासून अस्तित्वात होती, फक्त फरक हाच की यांनी त्यास योग्य दिशा दिली आणि अगदी तळागाळातील लोकांपर्यंत स्त्री-पुरुष समांतर शिक्षणाची संस्कारी चळवळ पोचवली.
कर्मवीरांच्या महान कार्याचा थोडक्यात सारीपाट...
श्रम सेवेचा उद्धाराचा मार्ग तुम्ही दाविला, कर्मवीरहो..!!!
लोकमानसी अढळ.. तुम्ही राहिला...!!!
जात-पात आणि धर्माचे अडथळे दूर करून ज्ञानाचा दिवा घराघरांत प्रज्वलित करणा-या आणि स्वातंत्र्यचळवळीस आधारवड ठरलेल्या रयत शिक्षण संस्थेची उभारणी करणा-या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन. दि. २२ सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज (कोल्हापूर) गावी भाऊराव पायगोंडा पाटील यांचा जन्म झाला. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते असणा-या भाऊरावांनी स्वाभिमान, स्वावलंबन, पराक्रम, पुरुषार्थ व मानवतेची पूजा या पंचसूत्री सद्गुणांचे संस्कार समाजमनावर केले. शिक्षणातून पोषण, बुद्धिवादाने रूढिवादाचा पराभव, समतेच्या आचरणाने विषमतेचे निर्दालन, श्रमाला प्रतिष्ठा ही भाऊरावांची तत्त्वप्रणाली होती. त्यांच्या या सामाजिक-शैक्षणिक कार्याबद्दल गाडगे महाराजांना अतीव प्रेम होते. ‘प्रत्येक खेडय़ात शाळा असली पाहिजे. विना शाळेचे एकही गाव महाराष्ट्रात असू नये. प्रत्येक नांगरापाठीमागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे’ असे स्वप्न बाळगणारा आणि ते प्रत्यक्षात उतरविणारा हा कर्मवीर! स्वातंत्र्यचळवळीसाठी हजारो कार्यकर्ते तयार करणारा हा आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार, महाराष्ट्राच्या समाज परिवर्तनाच्या चळवळींचा ज्ञानदूत दि. ९ मे १९५९ रोजी निधन पावला. २२ सप्टेंबर म्हणजे आज त्यांचा स्मृतिदिन, यामुळे मला या विचारात तरी पडायला भाग पाडले, एरवी असे विचार डुंकूनही पाहण्यात येत नाहीत. वाटत की चला ...आपणही जाऊ या आधुनिक जगाबरोबर...पण ते साफ चुकीचं आहे हे कळायला फार उशीर झालेला असतो. प्रत्येकाने जाग राहून याचे अनुकरण राहिले बाजूला पण विचार तरी करायला हवा, अस मला वाटतं. आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणणं बाकी राहील...
निज देहाचे झिजवुनी चंदन,
तुम्ही वेचला इथे कण कण.!!
आम्ही फुलविली हसरे नंदन,
स्मृतीस तुमच्या शत शत वंदन..!!
धन्यवाद....
Khup chaan pravinji
ReplyDeletedhanyawad
ReplyDelete