अनंत..पत्रास कारण की...

प्रिय अनंत...
स.न.वि.वि.


       खरं सांगू अनंत, तुला कित्येक दिवसांपासून पत्र लिहिण्याचा विचार मनात घोळत होता. आणि आज तो दिवस आला, तुझ्या वाढदिवसानिमित्त का होईना कधीतरी व्यक्त होण्याची संधी मिळाली, तुला माहितेय माझं वक्तृत्व इतकस चांगलं नाही. फोनवर तर आपलं बोलणं होतंच असत, पण सगळं डोक्यात होतं ते फक्त शब्दात आणायचं होतं. मग काय पत्र तयार. तू ही एकदा बोलला होतास मला पण पत्र खूप आवडतात, पण हल्ली ते बंदच झालेत. बरेच दिवस झालं मी पण कुणाला पत्र नाही पाठवलं. पूर्वी शाळेत होस्टेलला  असताना मी घरी पत्र पाठवायचो. खरं तर कुणाला पत्र लिहाव असे लोक फार कमी असतात. सगळ्याच गोष्टी शब्दात व्यक्त होतात च असं हि नाही. तरी हि हा पत्र प्रपंच. खूप काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात. का अन कशामुळे बोललो नसेल कळल नाही कधी. म्हणून तुला पत्र लिहावं वाटलं. तरी हि मनात जे आहे ते बाहेर येतच नाही. ती माझी कमजोरी म्हणा कि अजून काही. कुणास ठाऊक, ते मला पण माहिती नाही ? आज जग जरी तंत्रज्ञानाने बदलले असले तरी मला आवडतो तो पत्र व्यवहार. मनातल्या गोष्टी कागदावर उतरवण्यात जी मजा आहे ती बोलण्यात नाही.

          अनंत, आपली ओळख तशी एका संकटकालीन तू केलेल्या मदतीनेच झालीय. मी जेंव्हा माझं घर सोडून कोल्हापूरला आलो. जिथं कोणी ओळखीचं नव्हतं. सुदैवाने तुमच्यासारखे काही चांगले लोक भेटले. कोल्हापूरमध्ये जवळपास आपण तीन वर्षे एकत्र होतो. अन पुण्यात तीन चार वर्षे. कोल्हापूरमध्ये आपण युवा महोत्सव, राष्ट्रीय सेवा योजना अन विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यक्रमच्या निमित्ताने एकत्र यायचो, दंगा करायचो. या दंग्यात आपण पुरते हरवून जायचो ना..!! आठवतंय तुला आपण ज्यावेळी सोलापूरला कॅम्पला गेलेलो त्यावेळी पासून आपली मैत्री अजून घट्ट झाली. सोलापूरच्या कॅम्पमध्येच मी तुझ्यातलं नेतृत्वगुण ओळखलं होत अन त्यासोबतच तूला अभिनयाची झालर सुद्धा आहे हे सुद्धा दाखवून दिलं होतंस. काही नाती निर्माण करावी लागत नाहीत. ती होत जातात. नकळत. अनंत तु त्यातलाच एक. नकळत निर्माण झालेल हे नातं पुढे कधी वाढत गेल ते कळलचं नाही कधी.....

          कोल्हापूरला असताना आपल्याला एक पथनाट्य करायचे होतं, मला अभिनयातला 'अ'सुद्धा माहीत नसतांना तू मला त्यात ओढलं अन जबरदस्तीने करवून घेतलंस, यामुळेच पुढे जाऊन मी पण छोट्याछोट्या स्पर्धा केल्या. तुला तर अभिनयाचं व्यसन होतं ते आम्ही पुरेपूर पाहिलं आहे. एकदा तुझ्या 'सायकोपाथ' एकांकिकावेळी मी तुला त्रास दिला होता, मला त्यावेळी माहिती नव्हतं की एकांकिकावेळी फोटो काढायचं नसतात पण स्टाईल मारत ते मी घेत होतो, तुझा त्यावेळी राग अनावर झाला होता पण कसा गिळलास माहीत नाही. त्यावेळी मला वाटलं होतं आता माझं काही खर नाही. तुला अभिनयात आतल्या सारखा सहकारी मिळाला, एक सुंदर सहचारिणी आताची बायको मधुरा मिळाली. आयुष्य फार सुंदर जगत आलास. तुझ्याकड पाहून कधीकधी वाटतं, च्यायला आपण काय करतच नाही, कोणत्याही गोष्टीचा आनंद घेत नाही.

           तुझ्या सर्व आवडी निवडी करत तू शिक्षणाची कास कधी सोडली नाहीस, ते करतच राहिला. अनेकांना पुढे जाऊन आयुष्यात नोकरी मिळवावी लागते पण त्यास अपवाद ठरलास. कुणालातरी तुझी गरज आहे म्हणून तुला बोलावलं आहे, अस नेहमीच म्हणत आणि त्याचप्रमाणे तुझं व्यावसायिक आयुष्य चाललंय. यशस्वी होत चाललास. स्पर्धा परीक्षा बाबतीत तू जरा कच्चा आहेस. पण कुतूहलाने त्याविषयी मला नेहमीच विचारत असतोस. एवढं सगळं धकाधकीच्या जीवनातसुद्धा तुला तुझ्यातला समाजसेवक म्हण नायतर अन्य काही. किंगमेकर्स सारखा एक छान मित्र मैत्रिणीचा समूह निर्माण केलास. माझं काही नसताना त्यात मलाही सहभागी करून घेतलंस. एव्हाना एवढा मोठा मित्र परिवार असतो जिथं नात्याला प्रेमाची किनार असते, प्रत्येकाचा वाढदिवस असो वा सुखदुःख एकत्रित वाटून घेतलं जातं ते मी यात आल्यावर अनुभवलं. वाईट वाटलं मला एकदा तू मला बोललास की या ग्रुप मधून जरा बाहेर पडतोय(काही तत्कालीन कारणास्तव), पण नाही पुन्हा दंगा मस्ती सुरूच. पाहून बरं वाटलं. एरवी त्या
मिनी, आतल्या, अनुजा, मधुरा यांना पाहिलं तरी तुझी आठवण येते, त्यांचा तर अर्धा भागच बनला आहेस. प्लिज त्यांना कधीच दुखवू नकोस. आम्हाला वाटायचं आंत्या नेहमी मैत्रीनीच बनवत असतो, त्याला मित्र नकोच वाटतात, पण नाही तो माझा मूर्खपणा ठरला. मित्रांच्याही प्रेमात पडतोस.

         पुण्यात वास्तव्यास असताना आपण खूपदा भेटायचो, जेवायला, फिरायला जायचो. खरं सांगू तुझ्यासोबतच मी बाहेरच्या जेवणाचा मन मुराद आनंद घेतलाय. इथं असताना तू माझी बँकच होतास, तुला मी पाहिजे त्या वेळेला त्रास दिलाय. पण मला कधीच नाराज केलं नाहीस. नेहमीच मदतीचा हात पुढे केलास. अनंत खूप सारी मदत माझ्याकडून मी केली असेल पण माझ्याकडून तुझ्या आर्थिक अडचणीत मी मात्र येऊ शकलो नाही याचं मला वाईट वाटलं कारण हातात नोकरी नसल्याने काहीच करू शकत नाही पण एवढं मात्र नक्की पुढे कधीही तुला मी माझ्याकडून कमी पडणार नाही. पुण्यात तुझं काय महत्त्वाचे काम असलं की ते पिके फिक्स करणार हे हक्काचे व्यासपीठ असायचं, पुढेही असणार आहे. पण माझ्या मनात एक खंत मात्र आहे, पुणे सोडताना भेटून गेला नाहीस.

           अनंत, brother from another mother म्हणतात ना ते तू भाऊ आमचा आहेस. एकमेकांवर प्रेम करायला नाती रक्ताचीच असावी लागतात, असं काही नाही  हे तू खोडून काढलास. लहानात गेलास की लहान होतोस , मोठ्यात आला की आपोआपच प्रौढ पणा येतो तुला. मग सुरू होते तुझी आमच्यावर शाळा.  तुझ्याकडून मी बरंच काही शिकलो. निस्वार्थी वागायला शिकलो. दुसऱ्याला मदत करण्याची  मदतीची भावना आली. आपल्याला ज्या गोष्टी करता येत नाहीत त्या गोष्टीवर प्रेम कस करायचं ते तू शिकवलस. बरेच गन तुझ्यामध्ये आहेत. अनंत, पुन्हा कधीतरी एकत्र येऊन ते फिरायला जाणं, दंगा करणं, भरपेट खाणं नक्कीच करूया. मी ही वाट पाहत आहे.
       
               अनंत, न आवडणार पेक्षा आवडणाऱ्या गोष्टी खूप आहेत. मी नेहमीच म्हणत असतो तुझी चॉईस कधीच फेल जाणार नाही. त्याप्रमाणे तुला आयुष्यात छान मधुरा नावाची नावाप्रमाणेच गोड बायको मिळाली आहे. तिला सोबत घेऊन संसाराचा गाडा हाकतोय. ती नेहमीच आनंदी असते. तसंच कायम तिला ठेव. पुढे जाऊन तुम्ही दोघेही खूप मोठं व्हा. पण आम्हाला एक छोटासा पुतण्या लवकर द्या, त्याला मला चॉकलेट कॅडबरी घेऊन लवकरच यायचं आहे.

            मी तर प्रत्येक क्षण आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करतोय. म्हटलं तर तेच आपल्या हातात आहे. पण कोल्हापूर कायम लक्षात राहील. जेव्हा जेव्हा कोल्हापूरचा विषय येईल तेव्हा तेव्हा तुम्हा लोकांचा चेहरा समोर येईल. बाकी आपल्या आठवणींचा भरणा कायम सोबत घेऊनच फ़िरतोय. या व्यतिरिक्त काही लक्षात राहील असं काही नाहीचं. पण यासाठी आपली मैत्रीभेट झाली म्हणून ते महत्त्वाचं. अन्यथा काहीच नाही. वेळोवेळी तू मला केलेलं सहकार्य नक्कीच लक्षात राहील. आभार मी मानणार नाही, कारण आभार परक्यांचे मानायचे असतात स्वकीयांच नाही. मी नेहमीच हट्टाने तुझ्याकडे मला पाहिजे ते मागत राहणार, पुरवशील ना ते सगळे हट्ट.
          
         अनंत, माणसाचं आयुष्य हे फार वेगळच आहे. पुन्हा कधीतरी भेटू. “माणूस आशेवर जगतो, मग ती आशा कितीही निराधार असो, माणूस स्वप्नांवर जगतो मग ती स्वप्ने कितीही असंभाव्य असोत. “मनुष्याचं जीवन म्हणजे एका आशेकडून दुसऱ्या आशेकडे चाललेला प्रवास आहे. तेच आपण करतोय. आणि पुढे जाऊनही करणार आहोत.माझ्या
घरापासून कोसो दूर असणाऱ्या कोल्हापूरमध्ये काय होतं माझं, कोणी नव्हते, पण आता माझी हक्काची घर, आणि प्रेमाची संपत्ती झालीय. बाकी काय लागतं, माणसाला जगायला.

             अनंत आता पत्राचा शेवट करत आहे, सगळ्याच गोष्टी मी काय पत्रात लिहू शकत नाही कारण अनंत एक पत्र नसून पुस्तक आहेस. असच तुझ्या जीवनात आनंदी राहा. तुझ्या जीवन सुखानं समृद्धीन न्हाऊन निघू देत. तुला आरोग्यदायी दीर्घकाळ आयुष्य लाभू देत हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आंत्या ला माझ्या कडून अनंत शुभेच्छा. नावाप्रमाणेच तुझं उर्वरीत आयुष्यही अनंत असावं. याच शुभेच्छा.

बाकी लय मनावर घेऊ नकोस. काळजी घे. अन आता त्या माझ्या मी देणाऱ्या चॉकलेट च मनावर घे. लवकरच मला येण्याची कर. समजल ना...!!

           तुझाच,
    एक जिवलग मित्र
श्री. प्रविण बा. साळुंखे .

             

Comments

Post a Comment

Thank you...

Popular posts from this blog

बाबांन लेकी साठी लिहलेली कविता...

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी....!!!!