आयुष्याला द्यावे उत्तर...



                आज नवीन वर्षीची सुरुवात, सर्वांनी नवीन वर्षात नवनवे संकल्प केले असतील, कुणी डायरी आणून दिनक्रम लिहिणे, सकाळी गणपतीच्या पाया पडून दिवसाची तयारी, जिम लावणे, इत्यादी. ३६५ दिवसाची संपूर्णपणे गोळाबेरीज केली असेल पण उद्याचं काय विचारलं तर समोर प्रश्नचिन्ह उभे राहत.एकएक दिवसांचा विचार करत वर्ष कधी सरून जात ते कळत सुध्दा नाही म्हणून आजचा दिवस कसा आनंदी घालवता येईल हाच फक्त विचार केला तर त्या दिवशी तुम्ही उत्तरदायी असाल. आयुष्य म्हणजे काय..? प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना विचार आहेत पण आयुष्य जगत असताना कोणत्या पद्धतीने जगावं हे मराठी कवी विंदा करंदीकर यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून अतिशय सुरेख पध्दतीने मांडले आहे, ती कविता मला खूप आवडली म्हणूनच आपल्या बरोबर ती शेअर करतोय. आपल्या आयुष्याच्या संकल्पनाची परिपूर्ती करण्यासाठी हे फारच गुणकारी औषध आहे असं मला वाटतं. आयुष्याच्या बुद्धीपटलावरती स्पर्धा ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने आपल्या विचाराची निर्मिती करतो, कशाची भीती बाळगून आपले सामर्थ्य कमी करतो, इच्छा असते पण मार्ग मिळत नाही अशी द्विधा अवस्था आपल्या पाशी नेहमीच असते....पण हे शिवधनुष्य पेलल्याखेरीज माणूस म्हणून जीवन जगण्याचा आनंद घेता येणार नाही...मानव जन्म मिळाला हेच आपलं नशीब....मग आपणास यास आनंदी बनवण्यासाठी प्रयत्न तर केलाच पाहिजे....कवितेच्या ओळी पुढीलप्रमाणे.......

---आयुष्याला द्यावे उत्तर.....

असे जगावे दुनियेमध्ये,आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…

नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची…

असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…

पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना…

संकटासही ठणकावुन सांगावे, आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…

करुन जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास सार्‍या, निरोप शेवटचा देताना…

स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर-कातर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
                                   
कवी : विंदा करंदीकर
                                  धन्यवाद...
                                  श्री. प्रविण साळुंखे.(संकलित पोस्ट)

Comments

Popular posts from this blog

"तुलाही एक बहीण आहे"....

"बायको"-नावाचं अदभूत रसायन

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी....!!!!